राज्यसभा निवडणुकीत मोठा गेम होणार? शिंदेंनी डाव टाकला, शरद पवारच डेंजर झोनमध्ये !

Foto
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या संघर्षाची ठिणगी पडली आहे. राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी आणि थेट शरद पवार यांच्या गटाला थेट आव्हान देण्याची तयारी पूर्ण केली आहे. राज्यसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने आपला दुसरा उमेदवार मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतल्याने आता ही निवडणूक बिनविरोध होण्याचे सर्व मार्ग बंद झाले असून, चुरस शिगेला पोहोचली आहे. आमदारांच्या संख्याबळानुसार भाजपचे 4, शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांचा प्रत्येकी 1 आणि महाविकास आघाडीचा एक उमेदवार विजयी होऊ शकतो.

शिवसेना शिंदे गटाने आता राज्यसभा निवडणुकीत दोन उमेदवार देण्याचे ठरवल्याची माहिती समोर आली आहे. तसे झाल्यास राज्यातील 7 जागांसाठी 8 उमेदवार असणार आहेत. त्यामुळे निवडणूक बिनविरोध न होता निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. शिंदे गटाच्या उमेदवारामुळे महाविकास आघाडीच्या, विशेषतः शरद पवारांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. या निवडणुकीत आता अपक्ष आणि लहान पक्षांच्या आमदारांना मोठी मागणी येणार असून, घोडेबाजार होण्याची भीती राजकीय विश्‍लेषकांकडून व्यक्त केली जात आहे. तर, महाविकास आघाडीतील किती आमदार क्रॉस वोटिंग करणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. शिंदे गटाकडे जवळपास 16 मते अतिरिक्त आहेत. विजयासाठी 36 मतांचा कोटा आहे. शिंदे यांना राष्ट्रवादी अजित पवार आणि भाजपच्या अतिरिक्त मतांची आवश्‍यकता भासण्याची चिन्हे आहेत.

शरद पवारांवर टांगती तलवार

शिवसेनेच्या या आक्रमक पवित्र्यामुळे महाविकास आघाडीच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही खेळी करून आपली ताकद सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांना आपल्या संसदीय कारकिर्दीत आतापर्यंत एकाही पराभवाला सामोरे जावे लागले नाही. या राज्यसभा निवडणुकीत शिंदे गटाने दुसरा उमेदवार उभा केल्यास शरद पवार कशी खेळी करणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. आता प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी कोण कोणाला साथ देणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

शिंदे गटाकडून रिंगणात कोण?

शिवसेना शिंदे गटाकडून सोलापूरच्या डॅशिंग नेत्या ज्योती वाघमारे यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. दलित समाजातून येणाऱ्या वाघमारे यांचे सहा भाषांवर प्रभुत्व असून, त्यांच्या प्रभावी वक्तृत्वामुळे त्या राजकीय वर्तुळात ओळखल्या जातात. त्यांच्या उमेदवारीमुळे शिवसेनेने एकाच वेळी सोलापूर आणि दलित मतांचे समीकरण साधण्याचा प्रयत्न केला आहे.